Tuesday, September 24, 2019

एका फौजीचे आयुष्य !




आई.......


ओठांवर आलेले शब्द ओठांनाच घट्ट आवळून ओठांवरच विरले. रणांगणावर दुश्मनांच्या एक गोळीने माझ्या हृदयाला हेरले होते. एक प्रचंड कळ छातीतून मस्तकात शिरली. डोळे घट्ट मिटुन एक खोल श्वास घेऊन हळुवार सोडला. त्या एका श्वासात माझ्या डोळ्यासमोरून माझं सगळं आयुष्य झरझर निघून गेलं.

एक लहानशा खेड्यात जन्मलो. लहानपणापासून गरिबीत पण लाडात वाढलो. बहीण आणि भावासोबत खोड्या, मस्करी, भांडण करत करत मोठा झालो. शाळेत मित्रांसोबत दंगा मस्ती करूनही अभ्यासात हुशार होतो. इतरांसारखेच माझंही बालपण अगदी मजेत गेलेलं. हळूहळू मोठा होत गेलो. समजूतदारपणा येत होता. त्यावेळी कारगिल लढाई सुरू होती. लढाईचे वर्णन, सैन्याचे ते पराक्रम आणि बलिदान बघून अंगावर रोमांच उभे राहत. गावातल्या एखाद्या फौजीची हैरस्टाइल, त्यांचा रुबाब, त्यांना गावात मिळणारा मानसन्मान हे सारं पाहून आपणही सैन्यातच जायचं मनाशी पक्कं केलेलं. ही वर्दी माझं पाहिलं प्रेम आहे.

हळूहळू स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांत झोकून दिलं. सकाळी लवकर उठून पाळायला जाणे, व्यायाम करणे, अभ्यास करणे सुरू केलं. गाव उठायच्या आधी माझे हे सगळे कार्यक्रम पूर्ण झालेले असायचे. लक्ष फक्त एकच.. "वर्दी"

कॉलेज पूर्ण झालं. माझे प्रयत्न सुरूच होते. आणि एके दिवशी संध्याकाळी पोस्टमन घरी आला. माझं Joining Letter  आलं होतं. मी तसेच माझ्या घरचेही खूप खुश होतो. माझ्या मित्रपरिवारालाही खूप आनंद झाला होता.
माझ्या तर आनंदाला पारावर उरला न्हवता. पण मनात एक धाकधूक सुरू होती ती Training ची. ते म्हणतात ना..."एखाद्या उंचीवर पोहोचणं कठीण असतं पण त्याहूनही कठीण आणि अवघड असतं ते  त्या उंचीवर टिकून राहणं." मी अथक प्रयत्नांनी माझ ध्येय गाठली होतो पण त्याहूनही अवघड होतं ते ध्येय साकार करणं.

शेवटी माझा घरून जायचा दिवस आला. माझे घरचे, सगळे मित्र मला सोडायला आलेले. लहानपणापासून आजपर्यंत ज्यांच्या सोबत आयुष्य घालवलं त्यांच्यापासून लांब जाताना उर भरून आला होता. पण मनात आनंद सुद्धा होत होता.
ट्रेन सुरू झाली. ट्रेन पुढे जात होती आणि मी आठवणींत मागे. खूप काही मागे राहिल्यासारखं वाटत होतं.

ट्रेनिंग सुरू झालं. सोबतचे सगळे मित्र बनले होते. आमचा दिवस पहाटे तीन वाजता सुरू व्हायचा आणि रात्री अकरा वाजता संपायचा. दिवस-रात्र, ऊन-वारा-पाऊस काहीच कळायचं नाही. ते अळणी आणि बेचव जेवण पुढ्यात घेतलं की आईची खूप आठवण यायची. मन आतल्या आत रडायचं पण डोळे मात्र कोरडे असायचे. दिवसभर शरीर आणि मन दोन्हीही थकून जायचं आणि रात्री अंथरुणात पडल्यावर मन आपसूकच गावी जायचं. आपलं गाव, आपलं घर, आई- पप्पा, भाऊ- बहीन, आणि खास करून मित्र आठवायचे. त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण आठवायचे. त्या आठवणींनी मन हळवं व्हायचं आणि नकळत दोन अश्रू डोळ्यांच्या कडांचा आधार घेत उशीवर पडायचे. त्या आठवणींतच कधी शरीर झोपेच्या अधीन व्हायचं समजायचंच नाही.

दिवस जात होते. माझं ट्रेनिंग संपवून मी युनिटला गेलो. देशसेवा काय असते ते मला युनिटला गेल्यावर समजलं. पाठीवर 15-18 किलो सामान घेऊन 8-8 दिवस जीव मुठीत घेऊन डोंगरदऱ्या फिरायचो. कधीकधी दिवसातून फक्त एकदाच जेवण मिळायचं. कधीकधी वाऱ्यालाही संशय येणार नाही अशा चिडीचूप अवस्थेत फक्त कान आणि डोळे उघडे ठेवून किर्रर्रर्र अशा जंगलात अगदी रात्र-रात्रभर घात लावून बसायचो. तर कधी उभ्या पावसात दिवसरात्र ड्युटी द्यायचो. शरीर थकून जायचे पण मनात एक वेगळच समाधान असायचं. मी जे स्वप्न पाहिले होते ते साकार झालं होतं.

हळूहळू माझी पाच वर्षे नोकरी पूर्ण झाली. घरचे माझ्या लग्नाच्या तयारीत लागले. फौजिच्या आयुष्यात लग्न ही सुद्धा एक अग्निपरीक्षाच असते. कारण देशाला सांभाळण्यात जेवढे एक फौजिला त्याग करावा लागतो तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक त्याग त्याच्या बायकोला करावा लागतो. जर अर्धांगिनी चांगली, आपल्याला तसेच आपल्या घरच्यांना समजून घेणारी, वेळ पडली तर पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी, तर आपल्या पाठीमागेही संसाराचा गाडा सुरळीतपणे हाकणारी असली तरच फौजी इकडे खंबीरपणे, डगमगता देशसेवा करू शकतो.

- लेखक 
संदीप तिप्पे 

2 comments:

  1. We are proud of INDIAN ARMY
    SOLUTE TO ����INDIAN ARMY����

    ReplyDelete
  2. We are proud of INDIAN ARMY
    SOLUTE TO INDIAN ARMY

    PROUD OF YOU SIR🇮🇳

    ReplyDelete