Thursday, October 3, 2019

जाणता राजा ..!!



जाणता राजा म्हटलं की तोंडातून नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच.

मराठा साम्राज्य संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात.

अखंड हिंदुस्थानात ज्यावेळी परप्रांतीयांची आक्रमण होत होती, संपूर्ण हिंदू समाज त्यांच्या जुलूमांनी होरपळून गेला होता, इथे जन्माला येणारं प्रत्येक मूल हे गुलाम म्हणूनच जन्म घ्यायचं आणि गुलाम म्हणूनच मरायचं. यातूनही जे काही वीर योद्धा जन्म घ्यायचे ते स्वताचा स्वाभिमान,  स्वतःच अस्तित्व विसरून मुघलांची गुलामगिरी करण्यात धन्यता मानायचे.अशा या स्वाभिमान मेलेल्या हिंदुस्थानात, महाराष्ट्रभूमीत एक दैवी शक्ती जन्माला आली.

19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला आणि महाराष्ट्र भूमी पावन झाली. राजमाता जिजाऊ मासाहेबांनी लहानपणापासूनच  शिवरायांवर उत्तम संस्कार केले होते. रयतेची वर्षानुवर्षे होत आलेली पिळवणूक, अत्याचार दाखवले होते. शिवराय हे एक मोठ्या सुभेदारांचे पुत्र असूनही त्यांचे सवंगडी हे गरीब रायतेतीलच होते त्यामुळे गरीब लोकांची होणारी ससेहोलपट शिवरायांनी अगदी जवळून पाहिली. याची शिवरायांना मनातून खूप चीड यायची. आपणसुद्धा राम, कृष्ण यांसारखे काही करावे असे त्यांना वाटे. शिवरायांनी आपल्या सवंगड्यांमधूनच काही हिरे ओळखले आणि स्वराज्याचं स्वप्न पहिलं.


 वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात . शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी आपले बालसवंगडी कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर यांसारख्या सिंहाची छाती असणार्या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने "हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा" असे म्हणून स्वराज्याची आण घेतली.हिंदवी स्वराज्यासाठी मूठभरमावळ्यांनी जिवाची पर्वा करता स्वतःला झोकून दिले. राजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कधीही माणसाची जात पहिली नाही. त्यांनी कर्तृत्व आणि पराक्रमाला मानाचे स्थान दिले. शिवरायांच्या सैन्यात बारा मावळातील अठरा पगड जातीचे लोक होते. राजांनी त्यातूनच एक एक हिरा ओळखला आणि स्वराज्यस्थापनेच्या कार्यात जोडला.


शिवरायांवर रयत प्रचंड प्रेम करत. कारण स्वराज्य हे फक्त राजासाठी न्हवतं तर ते होत प्रजेसाठी, गोरगरीब रयतेसाठी. रांझ्याच्या पाटलाने एका गरीबाच्या मुलीवर बलात्कार केला म्हणून शिवरायांनी त्याचे हातपाय कलम केले. एका पाटलाला इतकी कठोर शिक्षा त्यापूर्वी कधीही झाली न्हवती. त्यामुळे रयतेला विश्वास झाला ही हे राज्य आपलं आहे. रयत शिवरायांच्या एका शब्दावर जीव ओवाळून टाकू लागली. कित्येकांनी आपल्या संसारवर - घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वराज्याच्या अग्निकुंडात आहुती दिली. केवळ स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी कोणत्याही अग्निदिव्यात उतरण्यासाठी तयार असणाऱ्या शिलेदारांनी मराठा इतिहासाला आपल्या पराक्रमाने अलौकिक झळाळी चढवली.

कोणी साक्षात मृत्यू दिसत असताना आग्र्याहून सुटकेसाठी मरणाच्या अंथरुणात झोपले, तर कोणी प्रतिशिवाजी बनून सिद्धी जौहरला भेटायला गेले, कोणी फक्त 300 मावळ्यांना साथीला घेऊन पावनखिंडीत मृत्यूला सुद्धा हरवून शिवरायांना वाचवले तर कोणी अवघ्या 60 रांगड्या मावळ्यांसह 2000 गनीम असलेला पन्हाळा जिंकून दाखवला, कोणी शिवरायांच्या एका शब्दखातर पिसाळलेल्या हत्तीशी झुंज घेतली तर कोणी 7 वेडे मराठे 10 हजार सैन्यावर तुटून पडले.स्वाभिमान गमावलेल्या मराठी माणसाच्या मनात राजांनी इतके स्वधर्मप्रेम आणि स्वराज्यनिष्ठा जागृत केली की मावळे आणि प्रजा हसत हसत स्वराज्यचरणी आपले प्राण अर्पण करत. यातच शिवरायांचा विजय दिसून येतो.

खुद्द राजांच जीवनसुद्धा खूप रोमांचक, पराक्रमी आणि धकाधकीच होत. राजांनी स्वतः अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. दक्षिण विजय आणि सुरत लूट या त्यातील मुख्य मोहिमा होय. अतिशय दुर्गम आणि अवघड असणारे जावळी खोरे सुद्धा राजांनी जिकले. आग्र्याहून सुटका, पन्हाळ्याहून पलायन, अफजलखान वध, पुण्यात लाल महालात शाहिस्तेखानावर हल्ला अशा अनेक पराक्रमी मोहीमा केल्या.


राजांनी प्रत्यक्ष लढाई करण्यापेक्षा सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांचा आणि पर्वत रांगांचा उपयोग करून "गनिमी कावा" या युद्धनीतीवर भर दिला. या नितीमुळे शिवरायांनी कमी मनुष्यबळ असताना सुद्धा अनेक लढाया जिंकल्या. एकाचवेळी आदिलशाही, मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, डच यांसारख्या परकीय  पातशाह्यांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लढाया करून, शह देऊन हिंदू धर्म आणि हिंदवी स्वराज्य सुरक्षित ठेवले.

राजांनी फक्त लढाया आणि मोहीमा करता प्रत्यक्ष रयतेच्या विकासाकडे भर दिला. शिवरायांनी पहिल्यांदा गुंठेवारी पद्धत उपयोगात आणून त्यावर जमिनीचा कस आणि उत्पादन बघून कर आकारणी केली. गरीब शेतकऱ्यांना बैल शेतीउपयोगी अवजारे देऊ केली. बी-बियाणे देऊ केले.  दोन - तीन वर्षानंतर शेतकऱ्याकडून करातून हळूहळू पैसे वसूल केले. जेणेकरून लोकांचा शेतीकडे ओघ वाढला. पडीक जमिनी सुद्धा सुपीक झाल्या आणि राज्याचे उत्पादन वाढले. शिवरायांनी सैन्याला मोहिमेला जाताना शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलासुद्धा धक्का लागता कामा नये, एखाद्या भागातून सैन्य जात असताना शेतीपासून दूर असणारा रस्ता उपयोगात आणावा असा सक्त आदेश दिला होता. दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांचा कर माफ केला. परकीय आक्रमणाच्या वेळी रयतेचे हाल होऊ नयेत म्हणून परकीय आक्रमणाच्या वेळी राजांनी जाणूनबुजून अवघड आणि डोंगराळ भाग निवडला.

शेवटी 6 जून 1674 रोजी शिवरायांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर 32 मनाचे (1280 किलो) सुवर्णसिंहासन बनवून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि राजे छत्रपती झाले. वर्षानुवर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या या महाराष्ट्रभूमीला पहिला छत्रपती मिळाला.


शिस्तबद्ध लष्कर सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीे महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या ,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर, तसेच समुद्री सुरक्षेसाठी आरमार उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक नवीन किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

अशा या जाणत्या राजाचे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर निधन झाले. अखंड हिंदवी स्वराज्य पोरकं झालं.

तर अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही. फक्त भावना, फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. आपली शिवभक्ती फक्त भगवा फडकवल्यावरच जागी होता कामा नये. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनली पाहिजे. शिवरायांच्या ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल. याबाबत समर्थांच्या काही ओळी लिहुन शेवट करतो.

शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | *शिवरायांचे कैसे बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे||
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप|
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी।

-लेखक 
संदीप तिप्पे